24 न्यूज अपडेट

पाणीप्रश्नावर आता आरपारची लढाई!

पाणीप्रश्नावर आता आरपारची लढाई!

नगरपरिषदेसमोर उद्यापासून समाजवादी पक्षाचे बेमुदत धरणे आंदोलन; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे खमरूल इमान यांचे आवाहन

बीड | प्रतिनिधी
नगरपरिषद सभागृहातील ४८ कोटींच्या कामावरून सत्ताधारी नगरसेवक आपसात भिडत असताना, बीड शहरातील नागरिकांच्या मूलभूत पाणीप्रश्नावर मात्र सत्ताधारी आणि विरोधकांचे मौन लज्जास्पद आहे, असा घणाघाती आरोप समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महंमद खमरूल इमान खान यांनी केला आहे.
शहराला अनियमित, दूषित व गलिच्छ पाणीपुरवठा होत असताना माजलगाव व बिंदुसरा धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असूनही नियोजनाअभावी नागरिकांना आठवड्यांपासून पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या गंभीर प्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी समाजवादी पक्षाने केली आहे.
नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाशी संबंधित तीनही टेंडर रद्द करून त्यांची निष्पक्ष चौकशी करावी, जलशुद्धीकरण केंद्रातील कामकाजाची तपासणी करावी आणि संपूर्ण शहरासाठी समान व नियमित पाणीपुरवठ्याचे नियोजन जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास उद्या, १० ऑगस्ट २०२६ पासून बीड नगरपरिषद कार्यालयासमोर समाजवादी पक्षाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
“४८ कोटींच्या श्रेयासाठी भांडण्यापेक्षा शहराच्या पाण्यासाठी एकदा तरी भांडा! हा प्रश्न कोणत्याही पक्षाचा नसून प्रत्येक बीडकराच्या जगण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी पक्षभेद विसरून एका व्यासपीठावर यावे आणि पाणीप्रश्नाच्या लढ्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन खमरूल इमान यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *