बीड / प्रतिनिधी
परळी शहरातील तोहिद खान या तरुणाच्या संशयास्पद हत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तोहिद खान याचा मृतदेह रेल्वे स्थानक परिसरात आढळून आल्यानंतर शहरात भीती, संताप आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाला नवे वळण देणारा एक कथित ऑडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओमध्ये एक व्यक्ती जातीवाचक उल्लेख करत एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून “हो, आम्हीच हत्या घडवली” अशा आशयाची कबुली देत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या घटनेबाबत नागरिकांमध्ये अधिकच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तोहिद खान हत्याकांड ही केवळ एक गुन्हेगारी घटना नसून कायदा व सुव्यवस्थेला दिलेले उघड आव्हान असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. एवढी गंभीर घटना घडूनही संबंधित आरोपी अद्याप कायद्याच्या कचाट्यात आले नसल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे.
या प्रकरणाचा तपास कोणत्याही राजकीय, सामाजिक अथवा अन्य दबावाखाली न होता निष्पक्ष आणि वेगाने पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. तपासादरम्यान समोर येणाऱ्या सर्व संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.
“जनतेला आश्वासन नव्हे तर कृती हवी आहे. आरोपींना संरक्षण मिळत आहे का? तपासात विलंब का होत आहे?” असे प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत असून या प्रश्नांची उत्तरे आता प्रत्यक्ष कृतीतूनच मिळाली पाहिजेत, अशी भावना व्यक्त केली जात आहे.


