24 न्यूज अपडेट

परळीतील तोहीद खान खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; दोन मित्रांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

परळीतील तोहीद खान खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; दोन मित्रांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

पैशांच्या व्यवहारातून झाला खून; पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळावर फेकल्याची कबुली

बीड | प्रतिनिधी
परळी तालुक्यातील सरदारनगर येथील अफजल खान उर्फ तोहीद कैराती खान पठाण (वय ३६) यांच्या खून प्रकरणाचा बीड स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत छडा लावत दोन आरोपींना जेरबंद केले आहे. पैशांच्या देणे-घेणेच्या वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सरदारनगर, परळी येथील अफजल खान उर्फ तोहीद खान हे ३१ मे २०२६ रोजी आपल्या मित्रासोबत बाहेर गेले होते. मात्र ते दोन दिवस घरी परतले नाहीत. त्यानंतर १ जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळांवर त्यांचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला ही घटना आत्महत्येची असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळ, तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला. तपासादरम्यान मयताच्या नातेवाईकांकडून आणि गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, तोहीद खान यांचा खून त्यांच्या दोन मित्रांनी केल्याचा संशय बळावला.
त्यानुसार ऋषीकेश परमेश्वर फड (वय २७, रा. सोमेश्वर नगर, परळी) आणि गौरव दीपक व्यास (वय २६, रा. स्नेहनगर, परळी) यांचा शोध घेण्यात आला. ३ जून रोजी दोघेही परळीत आल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून अफजल खान उर्फ तोहीद खान यांचा दगडाने ठेचून खून केल्याची कबुली दिली. तसेच गुन्हा आत्महत्या असल्याचे भासविण्यासाठी मृतदेह लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळांवर टाकल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी परळी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करीत आहेत.स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, आनंद मस्के, रामचंद्र केकान, सचिन सानप, गोविंद भताने, सचिन आंधळे आणि नितीन वडमारे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *