एक आरोपी अटक; ₹6.93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, गुन्हा उघड
बीड / प्रतिनिधी
दि. 02/08/2026 रोजी फिर्यादी श्री. रमेश उदावंत (वय 47 वर्षे, व्यवसाय सोनार, रा. हिवरसिंगा, ता. जि. बीड) हे निर्गुडी येथील आठवडी बाजारात सोन्या-चांदीचे दागिने घेऊन मोटारसायकलने हिवरसिंगा येथून जात असताना, सकाळी सुमारे 09.30 वाजण्याच्या सुमारास निर्गुडी-हिवरसिंगा रोडवर पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांची मोटारसायकल अडवून जबरदस्तीने त्यांच्या ताब्यातील सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेले. याबाबत पोलीस स्टेशन पाटोदा येथे गु.र.नं. 230/2026, कलम 309(3), 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गंभीर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदारांकडून प्राप्त माहिती तसेच खबऱ्यांच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेत असताना, गुन्ह्यातील रोहन ऊर्फ बॉबी संजय गुणवंत (वय 24 वर्षे, रा. शास्त्रीनगर, नाळवंडी नाका, बीड) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट कार (क्र. MH-12 JM-4300) तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल असे एकूण ₹6,93,800/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी श्री. नवनीत कांवत, पोलीस अधीक्षक, बीड, श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक, बीड, श्री विश्वजित खुळे उपविभागीय पोलीस अधिकारी आष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे, पोह अशोक दुबाले, पोह सोमनाथ गायकवाड, पोह बाळासाहेब सानप, पोह मारुती कांबळे, पोह आसेफ शेख, पोअ अश्विनकुमार सुरवसे व चापोअ सिद्धेश्वर मांजरे यांनी केली आहे.


