बीड / प्रतिनिधी
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन टंचाईबाबत विविध अफवा पसरत असताना बीड जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या संदर्भात शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत सविस्तर आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी, सहाय्यक पुरवठा अधिकारी, निरीक्षण अधिकारी तसेच BPCL, HPCL आणि IOCL या तेल कंपन्यांचे प्रतिनिधी आणि पेट्रोल-डिझेल-गॅस वितरक उपस्थित होते.
बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात सध्या सुमारे ३० दिवस पुरेल इतका एलपीजी गॅसचा साठा उपलब्ध असून पेट्रोल व डिझेलचा १० दिवसांपेक्षा अधिक साठा उपलब्ध आहे. याशिवाय संबंधित डेपोमध्येही सुमारे ३० दिवसांचा अतिरिक्त साठा उपलब्ध असल्याने जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, पेट्रोल, डिझेल किंवा गॅसच्या नावाखाली अतिरिक्त पैसे आकारणे, साठेबाजी करणे किंवा घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांनी टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, घबराटीत येऊन अनावश्यक साठा करू नये आणि गरजेपुरतेच इंधन खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


