बीड / प्रतिनिधी :
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायत सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत अत्यंत धक्कादायक निकाल लागला आहे. या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे.
या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मयत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. निवडणूक बिनविरोध व्हावी, असा संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचा प्रयत्न होता. मात्र गावकऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप करत स्वरूपानंद देशमुख यांनी निवडणूक रिंगणात उतरत थेट लढत दिली.
निवडणुकीत एकीकडे स्वरूपानंद देशमुख यांनी गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर भर दिला, तर दुसरीकडे आश्विनी देशमुख यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या नावावर भावनिक आवाहन करत मते मागितली. मात्र अखेर गावकऱ्यांनी विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने कौल दिला.
काल पार पडलेल्या मतदानानंतर आज जाहीर झालेल्या निकालात स्वरूपानंद देशमुख यांनी तब्बल ९२ मतांनी विजय मिळवत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
“९ मतांच्या पराभवातून ९२ मतांच्या विजयाकडे”
मागील निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांना संतोष देशमुख यांनी अवघ्या ९ मतांनी पराभूत केले होते. मात्र यावेळी त्यांनी जोरदार पुनरागमन करत संतोष देशमुख यांच्या पत्नीविरुद्ध तब्बल ९२ मतांनी विजय मिळवत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली.


