जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी; विविध संघटनांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
माजलगाव / प्रतिनिधी
परळी येथील तोहीद खान हत्या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करत विविध सामाजिक व अल्पसंख्यांक संघटनांच्या वतीने माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
अल्पसंख्यांक मुस्लिम संरक्षण समिती, शेतकरी कामगार पक्ष, मौलाना आझाद युवा मंच, APCR आणि जकीबाबा सोशल वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी बोलताना अल्पसंख्यांक संरक्षण समितीचे अध्यक्ष ॲड. नासेर खान यांनी सांगितले की, परळीतील तोहीद खान हत्या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. गुन्ह्यातील सर्व दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. तसेच न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवेदन देताना ॲड. नारायण गोले पाटील, नगरसेवक सय्यद लतीफ, शेख शौकत, इरफान मिर्झा, ॲड. डोंगरे, बाबा काझी, नवीद सिद्दीकी, ॲड. भास्कर उजगरे, गोरख टाकणखार, शेख सत्तार टेलर, जय राम राऊत, सुनील शेवाळे, गुलाब शेख, शेख इकरार, जावेद पटेल, नुमान चाऊस, सलमान खान यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, तोहीद खान हत्या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झाली असून, दोषींना कठोर शिक्षा मिळेपर्यंत आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत न्यायासाठीचा लढा सुरूच राहील, असा निर्धार उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.


