24 न्यूज अपडेट

बीड पोलिसांची देशातील पहिली End-to-End AI आधारित तपास प्रणाली ठरली चर्चेचा विषय

बीड पोलिसांची देशातील पहिली End-to-End AI आधारित तपास प्रणाली ठरली चर्चेचा विषय

DeepEye AI मुळे FIR, तपास, CCTV विश्लेषण ते Trial Monitoring सर्व काही एका क्लिकवर

राज्यस्तरीय तज्ज्ञ समितीकडून प्रकल्पाचे कौतुक; महाराष्ट्रभर अंमलबजावणीचा मार्ग मोकळा

बीड | दै. महाभारत
गुन्हे तपास प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करत बीड पोलीस दलाने विकसित केलेल्या ‘DeepEye AI’ या देशातील पहिल्याच End-to-End AI आधारित पोलीस व तपास सहाय्य प्रणालीची राज्यस्तरीय Proof of Concept (PoC) चाचणी बीड शहर पोलीस ठाण्यात यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या यशस्वी मूल्यमापनामुळे हा अभिनव प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

३ ते ४ तासांचे FIR काम आता अवघ्या ३ ते ४ मिनिटांत!

गुंतागुंतीच्या गुन्ह्यांमध्ये FIR तयार करण्यासाठी यापूर्वी ३ ते ४ तास लागत असत. मात्र DeepEye AI मुळे ही प्रक्रिया आता केवळ ३ ते ४ मिनिटांत पूर्ण होणार आहे. Live Voice, Audio Upload, e-FIR आणि OCR तंत्रज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीचे AI विश्लेषण करून BNS आणि BNSS मधील योग्य कायदेशीर कलमांची सूचना प्रणाली आपोआप देते.

FIR पासून न्यायालयीन निकालापर्यंत संपूर्ण डिजिटल ट्रॅकिंग

या प्रणालीद्वारे तक्रार नोंदणीपासून न्यायालयातील अंतिम निकालापर्यंत संपूर्ण तपास प्रक्रियेचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. घटनास्थळ पंचनामा मसुदा, वैद्यकीय अहवालांचे विश्लेषण, साक्षीदारांच्या जबाबांचे विश्लेषण (Witness Matrix) तसेच Trial Monitoring यांसारख्या सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

AI करणार CCTV आणि CDR चे स्मार्ट विश्लेषण

तासनतास CCTV फुटेज पाहण्याची गरज आता उरणार नाही. AI प्रणाली स्वतः फुटेजचे विश्लेषण करून संशयित व्यक्तींची Face Recognition आणि वाहनांची Vehicle Identification करते. तसेच Call Detail Records (CDR) चे विश्लेषण करून आरोपींमधील परस्पर संबंध शोधण्यातही ही प्रणाली पोलिसांना मोठी मदत करणार आहे.

२०१७ पासूनचा गुन्हेगारी डेटा AI मध्ये संग्रहित

बीड जिल्ह्यातील २०१७ पासूनचे सर्व FIR तसेच ८०० हून अधिक आरोपपत्रे (Charge Sheets) या प्रणालीच्या Knowledge Base मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे सराईत गुन्हेगारांचा पूर्वइतिहास क्षणार्धात उपलब्ध होतो. तसेच MPDA आणि MCOCA अंतर्गत कारवाईस पात्र असलेल्या आरोपींबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना AI त्वरित सूचना (Flag) देते.

राज्यस्तरीय तज्ज्ञ समितीकडून विशेष कौतुक

Mystic AI Solution चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव सक्सेना (माजी विद्यार्थी, IIT Kanpur), C-DAC चे जॉइंट डायरेक्टर महेश भार्गवा आणि IISER पुणेचे प्रा. प्रणव गोयल यांच्या तज्ज्ञ समितीने ६५ Proof of Concept (PoC) Test Cases द्वारे या प्रकल्पाची कठोर तपासणी केली.

पुणे पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मूल्यमापनात समितीने बीड पोलिसांच्या या अभिनव संकल्पनेचे विशेष कौतुक केले.

आधुनिक पोलीसिंगचा नवा आदर्श

DeepEye AI मुळे तपास प्रक्रिया अधिक वेगवान, अचूक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित होणार असून हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशातील इतर पोलीस दलांसाठीही आधुनिक पोलीसिंगचा आदर्श ठरण्याची क्षमता बाळगतो.

बीड पोलीस दलाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, भविष्यात राज्यभर या तंत्रज्ञानाची प्रभावी अंमलबजावणी होण्याबाबत मोठी उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *