24 न्यूज अपडेट

रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली चंदीगडमध्ये नीट व स्पर्धा परीक्षांतील विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली; सुखना तलावावर भव्य कँडल मार्च

रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली चंदीगडमध्ये नीट व स्पर्धा परीक्षांतील विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली; सुखना तलावावर भव्य कँडल मार्च

चंदीगडमध्ये बीडच्या कन्येचे प्रभावी नेतृत्व

चंदीगड | पठाण अमरजान
देशातील वाढती बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांमधील वारंवार होणारे पेपरफुटीचे प्रकार, युवकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितता आणि या परिस्थितीमुळे नैराश्याच्या गर्तेत जाऊन आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ चंदीगड प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने सुखना तलाव परिसरात भव्य व भावनिक कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले. या कँडल मार्चचे नेतृत्व अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या चंदीगड प्रभारी, माजी खासदार तथा राज्यसभा सदस्य आणि बीड जिल्ह्याची आन-बान-शान रजनीताई पाटील यांनी केले.
काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते हातात पेटलेल्या मेणबत्त्या, बॅनर, फलक आणि नीट व इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ, मानसिक तणाव आणि भविष्याबाबतच्या नैराश्यामुळे जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे घेऊन या मार्चमध्ये सहभागी झाले. संपूर्ण परिसरात शोकमय आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
यावेळी रजनीताई पाटील म्हणाल्या की, आज देशातील युवक आपल्या भविष्याबाबत सर्वाधिक असुरक्षित वाटत आहे. कोट्यवधी विद्यार्थी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात; मात्र वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे त्यांचा संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वास उडत आहे. ही केवळ प्रशासकीय अपयशाची बाब नसून देशातील युवकांच्या स्वप्नांवर झालेला गंभीर अन्याय आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, विविध स्पर्धा परीक्षांमधील सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीमुळे लाखो युवकांचे भविष्य अंधारात गेले आहे. अनेक गुणवंत विद्यार्थी मानसिक तणावाचे बळी ठरले असून अनेक कुटुंबांनी आपल्या लेकरांना कायमचे गमावले आहे. ही कोणत्याही लोकशाही सरकारसाठी अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी बाब असल्याची टीका त्यांनी केली.
कँडल मार्चच्या शेवटी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच देशातील युवकांचे हक्क, पारदर्शक परीक्षा व्यवस्था आणि रोजगाराच्या संधी सुनिश्चित करण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

चंदीगडमध्ये बीडच्या कन्येचे प्रभावी नेतृत्व

देशाच्या राजधानीजवळील चंदीगडमध्ये युवकांच्या प्रश्नांवर झालेल्या या महत्त्वपूर्ण आंदोलनाचे नेतृत्व बीड जिल्ह्याची आन-बान-शान, माजी खासदार तथा राज्यसभा सदस्य रजनीताई पाटील यांनी केल्याने बीड जिल्ह्याच्या जनतेसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *