आंध्र प्रदेश मधील काकीनाडा जिल्ह्यातील वेत्लापलेम गावात शनिवारी फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली. या भीषण स्फोटात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वंगालापुडी अनीता यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार १८ जणांचा मृत्यू झाला असून किमान सहा जण गंभीररीत्या भाजले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. जिल्हा दंडाधिकारी सगीली शान मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या वेळी कारखान्यात सुमारे २० कामगार काम करत होते. स्फोट इतका भीषण होता की परिसरात मोठा धूर आणि आगीचे लोळ उठले.
अनेक जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस व प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे.या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा फटाक्यांच्या कारखान्यांतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


