बीड / प्रतिनिधी :
बीड शहरात अवैध गुटखा साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, बीड शहर पोलीस स्टेशन हद्दीतील BSNL टॉवर परिसरात असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी अश्फाक शेख व मनोज परजणे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन छापा टाकला.
या छाप्यात सुमारे १ लाख ६१ हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी बीड शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
या कारवाईमुळे बीड शहरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


