मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिनितीन याहू यांच्या मृत्यूची अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि जगभरात खळबळ उडाली. मात्र, इस्रायल सरकारने तातडीने प्रतिक्रिया देत या सर्व बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचे स्पष्ट केले. नेतन्याहू जिवंत आणि सुरक्षित असल्याचा अधिकृत दावा करण्यात आला आहे.
अलीकडेच नेतन्याहू यांनी आपल्या ‘X’ (माजी ट्विटर) खात्यावर युद्ध परिस्थितीबाबत प्रतिक्रिया देणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलताना दिसत आहेत. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही सोशल मीडिया यूजर्सनी एक वेगळाच दावा केला.
यूजर्सच्या म्हणण्यानुसार, पत्रकार परिषदेदरम्यान नेतन्याहू यांनी हात वर केल्यावर त्यांच्या हाताला सहा बोटे दिसत असल्याचे काहींनी लक्षात आणून दिले. त्यामुळे हा व्हिडिओ AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापरून तयार केला असावा, असा दावा अनेकांनी केला. याच दाव्यांमुळे नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवांना अधिकच उधाण आले.
दरम्यान, अमेरिकेतील कंझर्व्हेटिव्ह कमेंटेटर कँडिस ओवेन्स यांनी देखील ‘X’ वर पोस्ट करत सवाल उपस्थित केला. त्यांनी “बिबी कुठे आहेत?” असा प्रश्न विचारत, नेतन्याहू यांच्या कार्यालयातून एआय व्हिडिओ का पोस्ट करण्यात आला आणि तो नंतर का हटवण्यात आला, असा सवाल केला. नेतन्याहू यांना ‘बिबी’ या टोपन नावाने ओळखले जाते.
मात्र या सर्व चर्चांदरम्यान इस्रायल सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या बातम्या पूर्णपणे अफवा असून त्या सोशल मीडियावर पसरलेल्या दिशाभूल करणाऱ्या माहितीचा भाग आहेत.
सध्या मध्यपूर्वेत तणावपूर्ण वातावरण असताना अशा प्रकारच्या अफवा पसरल्याने जागतिक स्तरावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


