24 न्यूज अपडेट

जनतेच्या विश्वासाचा मान: जयदत्त क्षीरसागर यांना ‘चंपावतीरत्न’ पुरस्कार

जनतेच्या विश्वासाचा मान: जयदत्त क्षीरसागर यांना ‘चंपावतीरत्न’ पुरस्कार

बीड / पठाण अमरजान
बीड जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणारे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना प्रतिष्ठेचा ‘चंपावतीरत्न’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, या सन्मानाचे श्रेय त्यांनी थेट बीडच्या जनतेला देत हा पुरस्कार जिल्हावासीयांना समर्पित केला.
रविवार, दि. २२ रोजी रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने शहरातील हॉटेल नीलकमल येथे आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. रो. सुधीर लातुरे आणि रो. मयंक गांधी यांच्या हस्ते क्षीरसागर यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी रोटरीचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “वादापेक्षा विकासावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेने मला नेहमीच साथ दिली. हा सन्मान माझा नसून बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा आहे,” असे ते म्हणाले. गेल्या ५० वर्षांत जिल्ह्याच्या विकासात झालेला बदल अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, “आम्ही सर्व काही केले असा दावा नाही, पण जे शक्य होते ते प्रामाणिकपणे करून दाखवले.”
जिल्ह्यातील पाणीटंचाई हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असल्याचे सांगत त्यांनी मराठवाड्याच्या हक्काचे २८ टीएमसी पाणी लवकर मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली. “बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याने समृद्ध व्हाव्यात आणि मजुरांच्या हातातील कोयता कायमचा थांबावा, हेच आमचे स्वप्न आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
यावेळी त्यांनी विकासासाठी जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन एकत्र काम करण्याचे आवाहन केले. “जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अजूनही अनेक कामे बाकी आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच, नाव न घेता विरोधकांवर टीका करत त्यांनी जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले. “काही लोक वरवरचे मुखवटे घालून भ्रम निर्माण करत आहेत. मात्र, जनतेने योग्य-अयोग्याची पारख करून विकासाच्या बाजूने उभे राहावे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात रो. हरीष मोटवाणी, रो. ओम मोतिपवळे, रो. मयंक गांधी यांसह विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींसह महिला-पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
एकूणच, ‘चंपावतीरत्न’ पुरस्काराने गौरविलेल्या या सोहळ्यामुळे बीड जिल्ह्यात विकासाच्या नव्या संकल्पनांना चालना मिळेल, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *