24 न्यूज अपडेट

बीडमध्ये आंबेडकर-फुले जयंती पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक; सौहार्द राखण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

बीडमध्ये आंबेडकर-फुले जयंती पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक; सौहार्द राखण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

बीड / प्रतिनिधी
आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महामानव महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या पार्श्वभूमीवर बीड शहर पोलीस ठाण्यात आज दुपारी २ वाजता शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहरात उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि सर्वत्र शांतता व ऐक्य टिकून राहावे, या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस SDPO श्री व्यंकटराम (IPS), पेठ बीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खेडकर, बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव, बीड शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, पोलीस हवालदार शहेनशाह सय्यद, पोलीस अंमलदार नवनाथ राख यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत शांतता समिती सदस्यांना मार्गदर्शन करताना SDPO व्यंकटराम यांनी जयंती उत्सव शांततेत, संयमाने व परस्पर सौहार्द राखत साजरा करण्याचे आवाहन केले. कोणत्याही प्रकारच्या अफवा, वाद किंवा गैरसमज टाळून सर्व समाजघटकांनी एकत्र येत सामाजिक एकोपा जपावा, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. महान समाजसुधारकांच्या जयंती हा केवळ उत्सव नसून सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा दिवस आहे, याची जाणीव ठेवून नागरिकांनी जबाबदारीने सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शांतता समिती चे सदस्य व समाजसेवक मुसा खान पठाण, अयुब खान पठाण, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम वीर तसेच पत्रकार पठाण अमरजान यांनीही विविध सूचना मांडत प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली.
बैठकीस बीड शहरातील विविध राजकीय पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी जयंती उत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वांनी एकमुखाने सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *