24 न्यूज अपडेट

जागतिक आरोग्य दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड पोलिसांचे मोफत आरोग्य शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जागतिक आरोग्य दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड पोलिसांचे मोफत आरोग्य शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस दल व नागरिकांचा सहभाग; “दररोज तासभर व्यायाम करा” – अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे आवाहन

बीड / पठाण अमरजान
आज ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बीड शहर पोलीस दलाच्या वतीने बीड शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी ५ ते ६ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
पोलीस अधीक्षक नवीन कावत यांच्या अध्यक्षतेखाली ‘समाधान ४८’ उपक्रमांतर्गत जनतेच्या समस्या सोडविण्याबरोबरच बीड पोलीस दल सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत आहे. रक्तदान, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन अशा उपक्रमांनंतर आयोजित केलेले हे आरोग्य शिबिरही त्याचाच एक भाग असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
या शिबिराचे अध्यक्षस्थान अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी भूषविले, तर पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची मोफत तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.शिबिरात डॉ. बोबडे (हृदयविकार व मधुमेह तज्ञ), डॉ. विशाल पिंगळकर (न्यूरोसर्जन – मान, पाठ व नसांचे विकार), डॉ. प्रमोद शिंदे (अस्थिरोग तज्ञ) आणि डॉ. जाजू (नेत्ररोग तज्ञ) यांनी सेवा देत नागरिकांची तपासणी केली.
यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर म्हणाले की, “आजच्या धावपळीच्या युगात आपण इंटरनेटवरून आरोग्याची माहिती घेतो, पण त्याचा प्रत्यक्षात उपयोग करत नाही. निरोगी राहण्यासाठी दररोज किमान एक तास व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.”
या आरोग्य शिबिराचा एकूण ७२ नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाला शहरातील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी बीड शहर पोलीस दलातील सय्यद शहेनशहा, भागवत सानप, गहीनाथ बावनकर, राजेंद्र मुंडे, शेख इलियास आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *