“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026” अंतर्गत ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी
मुंबई / प्रतिनिधी
राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र शासनाने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026” जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ₹2 लाखांपर्यंतच्या थकीत पीक कर्जाची माफी मिळणार असून यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
योजनेनुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज, जे 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत होते आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड करण्यात आलेले नाही, अशा कर्जांचा समावेश करण्यात आला आहे. एक किंवा अधिक बँकांमधील एकूण थकबाकी ₹2 लाखांपर्यंत असल्यास संबंधित शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
शासनाने स्पष्ट केले आहे की, सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक संबंधित बँकेतील कर्ज खात्याशी जोडणे तसेच आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. लाभ वितरण प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी बँकांनीही ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, जुलै 2026 च्या पहिल्या आठवड्यापासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता असून राज्यभरातील शेतकरी या योजनेकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होऊन शेती उत्पादन वाढीस चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


