24 न्यूज अपडेट

कोयत्याने वार करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला एलसीबीचा दणका; जबरी चोरी व घरफोडीचे दोन गुन्हे अवघ्या दोन दिवसांत उघड

कोयत्याने वार करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला एलसीबीचा दणका; जबरी चोरी व घरफोडीचे दोन गुन्हे अवघ्या दोन दिवसांत उघड

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; पुणे जिल्ह्यातून तीन आरोपी जेरबंद, चोरीचा मुद्देमाल व कोयता जप्त

बीड | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यात कोयत्याने वार करून जबरी चोरी करणाऱ्या आणि त्याच दिवशी घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या दोन दिवसांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे.
दि. २२ जून २०२६ रोजी राजेंद्र अभिमान नागरे (वय ४१, रा. थेरला, ता. पाटोदा) हे बीडहून आपल्या गावी मोटारसायकलवरून जात असताना रोहतवाडी शिवारात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी त्यांची मोटारसायकल अडवली. आरोपींनी त्यांच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम हिसकावून घेतली आणि कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. जखमी नागरे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच दिवशी आरोपींनी थेरला फाटा परिसरातील सिताबाई महादेव सोनवणे यांच्या घर व चहापान हॉटेल संकुलाचे कुलूप तोडून घरातील टीव्ही, मोबाईल तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला होता. या घरफोडी प्रकरणीही पाटोदा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दोन्ही गंभीर गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. पोउपनि श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला.
तपासादरम्यान हे गुन्हे इंदापूर (जि. पुणे) येथील आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने तातडीने इंदापूर येथे धाड टाकून खालील आरोपींना ताब्यात घेतले.
माऊली नामदेव पवार (वय २६),मयूर उर्फ ओंकार नितीन भोसले (वय २२),आदित्य उर्फ बाळा सिद्ध पवार (वय १९),सर्व आरोपी रा. इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे.
आरोपींकडून जबरी चोरी व घरफोडीतील मोबाईल, रोख रक्कम, टीव्ही, सोन्याच्या मौल्यवान वस्तू तसेच गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे. आरोपींना मुद्देमालासह पाटोदा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोउपनि ओंकार मरके करीत आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत व अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि श्रीराम खटावकर तसेच एलसीबीच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
बॉक्स
अवघ्या ४८ तासांत गुन्ह्यांचा छडा सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीने अवघ्या दोन दिवसांत आरोपींपर्यंत पोहोचत जबरी चोरी व घरफोडीचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणल्याने पोलीस दलाच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *